कोयना पाणलोट क्षेत्रात महिन्याभरात २२०० मिलिमीटर पाऊस

विजय लाड
कोयनानगर – जुलै महिन्यात मुसळधार पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाची संततधार पडत आहे. ३० जूनला ओहोटीला गेलेल्या कोयना धरणात एका महिन्यात २,२०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात जवळजवळ ६० टीएमसी वाढ झाली आहे. धरणात सध्या ७४.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठा धरणाच्या ६ वक्र दरवाज्याला टेकला असल्याची आनंदाची बातमी असून कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सज्ज झाले आहे.
जून महिन्यात पूर्णपणे उघडीप दिलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा रसातळाला गेला होता. धरणात केवळ १३ टीएमसी पाणीसाठा होता. १ जुलैपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गायब झालेला पाऊस सक्रिय झाला असून तो मुसळधार स्वरूपाचा पडत आहे.१३ टीएमसी वरुन तो ७४ टीएमसी झाला आहे. एका महिन्याच्या कालावधीत ६३ टीएमसी पाणीसाठ्याची धरणात वाढ झाली आहे. एका महिन्याच्या कालावधीत झालेली वाढ लक्षणीय आहे. केवळ १ महिन्यात नवजा येथे ३,३५८ मिमी, महाबळेश्वर येथे २,९४९ मिमी तर कोयनानगर येथे २,३१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गत चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ९७ मिमी, नवजा येथे १६३ मिमी, तर महाबळेश्वर येथे १२४ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २४,२०१ क्युसेक झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात २ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात 74.75 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठा धरणाच्या ६ वक्र दरवाजाला थडकला आहे. धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना प्रकल्पाने तयार केलेली धरण परिचालन सूचीप्रमाणे कार्यवाही होत आहे.
धरणाचा पायथा वीजगृह कार्यान्वित करुन त्याद्वारे २,१०० क्युसेक पाणीसाठा नदीपात्रात सोडून धरणाची वाढत जाणारी जलपातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न कोयना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पाऊस वाढला व त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर धरणाचे वक्र दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. धरण परिचालन सूचीप्रमाणे पाणी सोडायला सध्या ४ टीएमसीने पाणीसाठा कमी असल्याने सध्या तरी पाणी सोडता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





