Satara News : कोयना परिसर होणार पर्यटनाचे हब; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

मुंबई : कोयना परिसराला पर्यटनाचे हब बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कोयनानगर रिसॉर्टचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मंत्री ना. देसाई यांनी सांगितले की, कोयना धरण आणि जलाशय परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून येथे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पर्यटनविषयक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये एमटीडीसी रिसॉर्टचा संपूर्ण कायापालट करून आधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथील पर्यटनविषयक कामांची आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
कोयनानगर येथील पर्यटन विभागाच्या रिसॉर्टची सद्यस्थिती मंत्री देसाई यांनी बैठकीत जाणून घेतली. देसाई म्हणाले, ‘‘याठिकाणी पाच व्हीव्हीआयपी, पाच व्हीआयपी आणि उर्वरित ठिकाणी कॉटेज तयार करण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच या रिसॉर्टच्या जागेसंदर्भात काही प्रश्न असतील ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक स्तरावर सोडवावेत.’’
कोयनानगरचे नेहरू उद्यान विकसित करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या तीन एकर जागेवर असलेल्या या उद्यानाच्या बाजूच्या रिकाम्या जागेवर उद्यान वाढवण्यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पातील कामांमधील अडीअडचणींचा आढावाही मंत्री देसाई यांनी यावेळी घेतला. या उपक्रमांमुळे कोयनानगर परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येईल, असा विश्वास मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.





