पारनेर – पारनेर येथे खासगी डॉक्टरांच्या पुढाकाराने कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या हॉस्पिटमध्ये तालुक्यातील बाधित रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. या हॉस्पिटलमध्ये 38 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे 21 बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तालुक्यातील सुपा येथे दोन खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर म्हणून ताब्यात घेतले होते. मात्र तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी खासगी हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून ताब्यात घेतल्यावर तेथे लागणारा डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध कसा करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पर्याय म्हणून खासगी डॉक्टरांच्या पुढाकारातून पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले असून, तेथे 38 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरजेनुसार त्यात वाढही करण्यात येणार आहे. यामुळे करोना बाधितांना एकाच जागेवर सर्व सुविधा मिळणार आहेत. ग्रामीण रुग्णालयात करोनाबधितांसाठी हॉस्पिटल सुरू करण्यात आल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांसाठी पारनेरमधील खासगी डॉक्टर मोफत सेवा पुरवणार आहेत. कोविड हॉस्पिटलसाठी डॉ. श्रीकांत पठारे, डॉ. बाळासाहेब पठारे, डॉ. आर. जी. सय्यद, डॉ. संदीप औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. विजय जगताप आदींचे सहकार्य लाभले आहे. करोना रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारे केंद्र करोना रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य कसे चांगले राहील, त्यांना सकारात्मक ऊर्जा कशी मिळेल, त्यासाठी म्युझिकल योगाचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल म्हणजे केरोना रुग्णांची मानसिक आणि आरोग्याची काळजी घेणार केंद्र म्हणून उभे करायचे आहे. खासगी डॉक्टरांनी यासाठी घेतलेला पुढाकार पाहून आनंद झाला, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.