फक्त 250 रुपयात करा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, ‘या’ कंपनीने सुरू केली खास ‘छोटी एसआयपी’ योजना

Kotak Mutual Fund introduces ‘Choti SIP’ | भारतात गेल्याकाही वर्षात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून गुंतवणूकदारांसाठी नवीन एसआयपी योजना सुरू केल्या जात आहेत. आता कोटक म्युच्युअल फंडने ‘छोटी एसआयपी’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार फक्त 250 रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.
काही दिवसांपूर्वी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (AMFI) छोट्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नियमावली जारी केली होती. याच पार्श्वभूमीवर कोटक म्युच्युअल फंडने छोटी SIP (स्मॉल तिकीट SIP) योजना सुरू केली आहे.
कोटक महिंद्रा एसेट मॅनेजमेंट कंपनीचे (KMAMC) व्यवस्थापकीय संचालक नीलेश शाह यांनी माहिती दिली की, भारतातील केवळ 5.4 कोटी लोकं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. अद्याप बरेच लोक म्युच्युअल फंडपासून लांब आहेत. नवीन गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी एसआयपी एक चांगला पर्याय आहे. Choti SIP च्या माध्यमातून फक्त 250 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येईल.
मात्र, कोटक म्युच्युअल फंडच्या छोटी एसआयपी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी देखील आहेत. यासाठी गुंतवणूकदार आधीपासूनच कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नसावा. कमीत कमी 60 महिने एसआयपीचा रक्कम भरावी लागेल. तसेच, एसआयपीची रक्कम केवळ NACH अथवा UPI ऑटो-पे च्या माध्यमातूनच भरता येईल.
जे गुंतवणूकदार पहिल्यांदाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यासाठी छोटी एसआयपी योजना फायद्याची ठरेल. गुंतवणूकदार छोट्या स्तरापासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात. यामुळे भविष्यात त्यांना फायदा होऊ शकेल.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)





