Koregaon Crime – भोसे गावच्या हद्दीत प्रेमसंबंधांच्या संशयातून झालेल्या ऊसतोड कामगाराच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित अजय राजेंद्र माने (रा. भोसे) याला कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.मच्छिंद्र अंबादास भोसले (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे. दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी अजय माने याने मच्छिंद्रला जेवणाचे आमिष दाखवून कोपीवरून बाहेर नेले. त्यानंतर मच्छिंद्र घरी परतलाच नाही. रात्री उशिरा अजय माने हा एकटाच परत आला व मच्छिंद्रला गटामध्ये सोडल्याचे सांगत त्याचा मोबाईल मच्छिंद्रच्या पत्नीला परत दिला. मात्र मच्छिंद्रचा स्वतःचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांचा संशय अधिकच बळावला. याचदरम्यान अजय माने याच्याकडून धमकीचे फोन आल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला होता.मच्छिंद्र बेपत्ता झाल्यानंतर दि. १७ जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आणि नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू असतानाच, आपल्यावर संशय वाढत असल्याचे लक्षात येताच अजय माने याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. उपचारानंतर कोरेगाव पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याला रीतसर अटक केली. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तपास करत आहेत.