Koregaon Bhima: मेघांनी व्यापला कोरेगाव भीमा परिसर; पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी
Koregaon Bhima: वातावरणात गारवा

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा परिसरात आज दुपारपासून आकाशात काळ्या ढगांनी दाटी केली असून परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आकाशात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष हवामानाकडे लागले आहे.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळेकुट्ट ढग परिसरात जमा झाले. ढगांच्या दाट थरामुळे दिवसाढवळ्याही संध्याकाळ झाल्यासारखे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
शेतकरी वर्गाकडून खरीप हंगामातील पिकांसाठी समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी पूर्ण केली असून आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, मेघ दाटून आल्याने पाऊस होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. परिसरात वातावरणातील बदलामुळे नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





