डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरेगाव प्रशासन अक्शन मोडवर; मुख्याधिकारी ऑनफिल्डवर; प्रत्येक प्रभागात तपासणी मोहीम

कोरेगाव – शहर आणि परिसरात विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश आहे. डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत आणि आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले असून शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मुख्याधिकारी ऑनफिल्डवर आहेत. त्यांनी प्रत्येक प्रभागात तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. यंदाही तेच कोरेगाव शहर व परिसरात चित्र पाहायला मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्णू उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाय योजना करण्यासाठी मोहीम राबवली आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक परिसरापासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी शंकर गांधीले यांच्या समावेत समन्वय ठेवत नगरपंचायतीने आशा सेविका आणि नगरपंचायत कर्मचारी अशा एकूण २६ टीम तयार केल्या असून त्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी होम टू होम सर्वे करून कंटेनर तपासणी करावी, यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक घरात जनजागृतीपर माहितीपत्र दिले जात असून प्रत्येकाला डेंग्यू रोखण्यासाठी करावयाची उपायोजना याबाबत माहिती दिली जात असल्याचेही विजया घाडगे यांनी सांगितले.
तीन मोठ्या आणि एक लहान फॉगींग मशीनद्वारे प्रभाग निहाय औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुख्यत्यवे बांधकामाच्या साईट आणि भंगार दुकानांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक मोठ्या इमारतीच्या टेरेसवर साचलेल्या पावसाच्या पाण्याची तपासणी केली जात आहे. नागरिकांना पाणी साठून न देण्याबाबत आवाहन केले जात असून जनजागृती देखील केली जात आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या अळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातींचे डास तयार होऊ नये, यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी स्वच्छता असणं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे.
डेंग्यूच्या अळ्या या स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात तयार होतात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळं घरात एसी, फ्रीजखाली साचलेलं पाणी, फुलदाण्या, शोभेची झाडं याकडं विशेष लक्ष ठेवणं आणि त्याठिकाणी पाणी खूप दिवस जमा न होऊ देणं गरजेचं ठरतं. त्याचबरोबर आपल्या घराच्या आसपासच्या परिसरातही खड्डे किंवा इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले नसेल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. गांधीले यांनी केले आहे.





