महिला डॉक्टर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, मृतदेहात 150 मिलीग्राम…, सामूहिक बलात्काराचा संशय

कोलकाता- कोलकात्याच्या सरकारी आरजी कार हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी दावा केला आहे की, मृताच्या शरीरावरील जखमांच्या खुणा या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असल्याचे दर्शवतात.
डॉक्टरांनी कोलकाता पोलिसांच्या सुरुवातीच्या दाव्याचे खंडन केले आहे, ज्यात म्हटले आहे की या गुन्ह्यात फक्त एकच व्यक्ती सामील आहे. पीडितेच्या शरीरात 150 मिलीग्राम वीर्य सापडल्याचा दावा त्यांनी केला. शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत मृताच्या पालकांनी उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींसमोरही हे सांगितले होते.
मृताच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा –
डॉ. सुवर्णा गोस्वामी म्हणतात की, इतके वीर्य एका व्यक्तीचे असू शकत नाही. त्यामुळे एकापेक्षा जास्त जणांनी पीडितेवर बलात्कार केल्याचा संशय आहे. मृताच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत, ज्यावरून हा क्रूर आणि हिंसक हल्ला झाल्याचे सूचित होते.
मृतदेह दाखवण्यासाठी मृताच्या आईला तासन्तास बसवून ठेवले –
दुसरीकडे, महिला डॉक्टरच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, रुग्णालयात पोहोचल्यानंतरही त्यांना मृतदेह पाहू दिला नाही. मला माझ्या मुलीला भेटू द्या म्हणून मी त्यांच्या पाया पडले. तीन तासांनंतर दुपारी दोन वाजता त्यांनी आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह दाखवला.





