कोल्हापूर : विद्यार्थीनी वसतीगृहासाठी निधी देणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

कोल्हापूर – येथील राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थीनी वसतिगृहाची तीन मजली इमारत अतिशय नितांत सुंदर असून भविष्यात आणखीन एक मजला वाढविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देवू अशी घोषणा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

भास्कराचार्य प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या सहकार्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या (कोल्हापूर) प्रांगणात राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थीनी वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (पुणे) उपाध्यक्ष आ. प्रकाश आबिटकर, माजी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. महेश शिंदे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रा.नितीन बानगुडे पाटील, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, राज्यात कृषी अभ्यासक्रमाला 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थीनी प्रवेश घेतात ही चांगली बाब असून येत्या आठवड्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्याचा आपला मानस आहे. राज्यात कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्यातील 30 टक्के योजना या केवळ महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे सांगून कृषीमंत्री भुसे यांनी येथील ‘रामेती’ प्रशिक्षण संस्थेला 3 कोटी रुपयांचा निधी देवून तेथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले.

कृषी महाविद्यालयाचा परिसर अतिशय मोठा असून या महाविद्यालयाच्या मालकीच्या जमिनीची सुरक्षितता जोपासण्यासाठी सरकारने निधी द्यावा अशी मागणी आ. आबिटकर यांनी केली. तर महाविद्यालयाच्या परिसरासह इतर ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षा आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

या कृषी महाविद्यालयात एकूण 1039 विद्यार्थी शिकत असून त्यापैकी सुमारे 481 विद्यार्थीनी आहेत. अडीच कोटी रुपये खर्च करुन ही इमारत बांधण्यात आली असून या वसतिगृहात एकूण 105 विद्यार्थीनी राहण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी प्रास्ताविकात केले तर आभार प्रदर्शन अधिष्‍ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

या कार्यक्रमासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे, संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे स्थानिक अध्यक्ष प्रा. डॉ. भारत खराटे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी, इतर प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.