Kolhapur News : कोल्हापुरात फुटबॉल लढतीदरम्यान दोन गटात राडा

कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर शहरातील फुटबॉलचे प्रेम मान उंच करायला लावणारे असताना दुसरीकडे अती-उत्साही प्रेक्षकांचा उपद्रव वाढत चालला आहे. यातूनच एका सामन्या वेळी पुन्हा एकदा शिवाजी स्टेडियम मध्ये चांगलाच राडा झाला. फुटबॉल शौकिनांच्या हुल्लडबाजीमुळे सामन्याचा नूर पालटला. पोलिसांना लाठीमार करून हुल्लडबाजांना पांगवण्याची वेळ आली.
गेल्या काही दिवसापासून भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरे, सिद्धेश साळोखे, दर्शन पाटील यांनी पूर्वाधात ३० गोलनी वेताळमाळवर आघाडी मिळवली. उत्तरार्धात वेताळमाळची चांगलीच दमछाक झाली.
यातूनच वेताळमाळ आणि शिवाजी तरुण मंडळाच्या समर्थकांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली. प्रेक्षक गॅलरीत दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. पाण्याच्या बाटल्या भिरकावून दिल्या जात होत्या. भर मैदानात बेदम मारहाण सुरू झाली. स्पर्धा संयोजकांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. संपूर्ण वेळेत शिवाजी संघाने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर गॅलरीतील वाद स्टेडियमच्या बाहेर पुन्हा उफाळला.
स्टेडियमच्या बाहेर दोन्ही संघाच्या ४० जणांच्या समर्थकांनी एकमेकांचा अंगावर धावून जात पुन्हा गोंधळ सुरू केला. यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठी करण्यास सुरुवात करत गर्दीला पांगवले मात्र या राड्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. या सर्व प्रकारावर फुटबॉल प्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.





