खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न.. कोल्हापूरमधील उद्योजकाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःसह कुटुंबाचे संपवले जीवन

कोल्हापूर – गडहिंग्लजमधील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन करत गळ्यावर सुरी ओढून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते तणावाखाली होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला आहे.
या घटनेनंतर गडहिंग्लज शहरवासीयांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. संतोष हे ज्या कारणामुळे तणावाखाली होते त्याबाबत विस्तृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी संतोष शिंदे यांच्या बेडरूमचे दार न उघडल्याने त्यांच्या आई यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी बेडरूममध्ये तिघांचेही मृतदेह आढळून आले. तसेच त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यांच्या मानेवरही जखमा आढळल्या आहेत.
सदर सुसाईट नोट गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे. मात्र, एका उमद्या उद्योगपतीने अशा भयावह पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष शिंदे यांनी करोना काळात सामाजिक बांधिलकी जपत मोठी मदत केली होती.





