कोल्हापूर – “स्वच्छता दूत’ म्हणून आपली ओळख निर्माण केलेले महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. कलशेट्टी यांच्या बदलीचे ठिकाण अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
डॉ. कलशेट्टी यांनी कोल्हापूरात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नेहमीच त्यांचे कौतुक होत असते. स्वतः हातात झाडू घेऊन त्यांनी कोल्हापुरात प्रत्येक रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्याची एक सुरुवात केली.
बघता बघता एकूण 75 रविवारी त्यांनी स्वतः महास्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्यांच्या या उल्लेखनीय उपक्रमामुळे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होऊ लागला. शिवाय अनेकांना एक चांगला संदेश सुद्धा पोहोचला.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी “नो व्हेईकल डे’ साजरा करण्याचाही संदेश कलशेट्टी यांनी दिला. याशिवाय स्वतः सायकल वापरून आपणही अशाच पद्धतीने सायकलचा वापर करा, असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून घडले आहेत.