Kolhapur Assembly Election 2024 : यंदा देखील राज्यात सर्वाधिक मतदान करत कोल्हापूरकरांनी आपली परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून केलेल्या काम आणि जोडण्यानंतर आता आपला नेता निवडून येणार याचा कॉन्फिडन्स मोठ्या प्रमाणात आले आहे. आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी या सगळ्याचा महाफैसला होणार आहे. राज्यातील 288 मतमोजणी केंद्रांवर आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम उघडण्यात आल्या असून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून यात राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. तर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असून याचा जल्लोष राज्यभरात केला जात आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत भाजपचा ध्वज फडकवत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती : जिल्ह्यात दहा मतदारसंघांत अटीतटीच्या लढती होत असून महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल, माजी आमदार अमल महाडिक, जनसुराज्यचे अशोकराव माने, माजी आमदार चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात समरजित घाटगे, राजेश लाटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, गणपतराव पाटील, मदन कारंडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. तर राधानगरीतून अपक्ष ए. वाय. पाटील, शिरोळमधून स्वाभिमानीकडून माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंलेतून स्वाभिमानीकडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंदगडमधून अपक्ष शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील, जनसुराज्यचे मानसिंग खोराटे, करवीरमधून जनसुराज्यचे संताजी घोरपडे हेदेखील आपले नशीब अजमावत आहेत.