कोल्हापूर | 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी; महावितरणकडून गुन्हा दाखल

कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता.हातकणंगले) येथील दोन लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केली आहे. सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले यांच्याविरूध्द कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे.
महावितरणच्या इचलकरंजी ब उपविभागाच्या शहापूर शाखा कार्यालयाकडून दि. 17 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 11.30 वा. पासून ते दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे पर्यंत कोरोची (ता.हातकणंगले) येथील अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले या दोन लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीजजोडणीधारक ग्राहकांच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष एमआरआयव्दारे तपासणी केली. सदर तपासणीत रात्री 11.30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वीजेचा वापर सुरू असताना मीटरवरील वीजदाब व वीजप्रवाह शुन्य असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी शेजारील एका ग्राहकाच्या वीजमीटरची एमआरआयव्दारे तपासणी केली असता मीटरवर वीजदाब योग्य असल्याचे आढळून आले.
कोल्हापूरच्या बापट कॅम्प स्थित मीटर चाचणी प्रयोगशाळेत वीजचोरी प्रकरणातील दोन्ही वीज मीटरची पुढील तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटरचे बी फेज वा न्युट्रल वीजपुरवठा काढला असता वीज मीटर पुर्णत: बंद होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर सदर दोन्ही मीटर पुढील तपासणीसाठी एल ॲन्ड टी कंपनी म्हैसुर येथे नेण्यात आले. या तपासणीत वीजमीटरला उच्च दाबाने वीजपुरवठा दिल्याने आर व वाय फेजचे रेझिस्टन्स जळालेले असून मीटरमधील पीसीबी बोर्ड मधून तुटून मीटरच्या आतील बाजूस पडल्याचे निदर्शनास आले.
अजय अशोक मेंडगुदले व अशोक महादेव मेंडगुदले या दोन ग्राहकांनी मीटरला बाह्य उपकरणाव्दारे उच्च दाबाचा वीज प्रवाह देवून मीटरचे रेझिस्टन्स जाळून व ठराविक रात्रीच्या वेळी मीटरच्या न्युट्रलव्दारे मीटरवर नियंत्रण मिळवून वीजमीटरवर वीजवापराची नोंद होणार नाही, या पध्दतीने मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे सिध्द झाले.
अजय अशोक मेंडगुदले या ग्राहकाचा वीजचोरीचा कालावधी 2 वर्ष 3 महिने इतका निर्धारीत केला असून या कालावधीत 7 लाख 97 हजार 898 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 1 कोटी 99 लाख 37 हजार 950 रूपये व तडजोड रक्कम 20 लाख रूपये एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. ग्राहकास वीजचोरी व दंडाचे बिल दिलेले आहे.
अशोक महादेव मेंडगुदले या ग्राहकाचा वीजचोरीचा कालावधी 5 महिने इतका निर्धारीत केला असून या कालावधीत 1 लाख 26 हजार 561 युनिटची वीजचोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 26 लाख 33 हजार 720 रूपये एवढे महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले आहे. अशोक महादेव मेंडगुदले या ग्राहकावर यापुर्वी माहे फेब्रुवारी 2021 मध्ये महावितरणच्या भरारी पथकाने वीजचोरीप्रकरणी कारवाई केली होती. त्यावेळी वीजचोरीची 52 लाख 43 हजार 690 रूपये व तडजोडीची 15 लाख 60 हजार अशी एकूण रक्कम 68 लाख 3 हजार 690 रूपये ग्राहकांने भरणा केली होती.
सदर वीजचोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135 अन्वये संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी ही कारवाई केली.





