पिंपरी, (प्रतिनिधी) – विद्यार्थीदशेत असताना आपल्या भविष्याचा अभिमान वाटावा यासाठी स्वतःमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करा. आज तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यातील यश आणि पूर्ततेवर लक्षणीय परिणाम करू शकतात. उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक म्हणजेच ज्ञानाला अधिक आत्मसात करा, असा सल्ला ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी दिला. सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारी योजक सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच ‘नववी व बारावीनंतर विज्ञान व तंत्रज्ञान विषयात असलेल्या संधी’ या विषयावर आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी रमेश वेणूगोपालस्वामी, विजय वावरे, अनुजा सप्तश्वा, रेश्मा आंधळे हे प्रमुख पाहुणे तर संस्थेच्या संचालिका रेणू इनामदार उपस्थित होत्या. योजक संस्था व बजाज अॅटो लि.च्या सीएसआर विभागाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील 12 वस्त्या व खेड तालुक्यातील 4 गावांमध्ये चालविण्यात येणार्या कम्युनिटी लर्निंग सेंटर्समधील सुमारे 800 विद्यार्थी व संबंधीत शिक्षक सहभागी झाले होते. विवेक वेलणकर म्हणाले, विज्ञानामध्ये करिअर करतांना शक्य तितके शिकत रहा. विद्यार्थी दशेत चांगल्या सवयी लावणे म्हणजे भक्कम इमारतीचा पाया रचण्यासारखे आहे. शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल तर अभिक्षमता चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे. करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच खुले होतात. करिअरसाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी पर्याय वाढले असले तरी स्पर्धाही वाढल्या आहेत. मात्र करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असेही मत त्यांनी मांडले. रेणू इनामदार म्हणाल्या, गेल्या दीड दशकापासून योजक सामाजिक संस्था पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावे पिंपरी चिंचवडमधील वस्त्यांमध्ये शिक्षणाच्या व विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी कार्यरत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे दरवाजे तळागळातील विद्यार्थ्यांसाठी उघडणे गरजेचे आहे. या संस्थेमार्फेत चालविल्या जाणार्या कम्युनिटी लर्निंग सेंटर्समध्ये पहिली ते बारावी पर्यतच्या 2500 हून अधिक विद्यार्थी घेत आहेत. लाभ धारकांमध्ये दुर्बल घटकांबरोबरच मुलींची संख्या लक्षणीय आहे. यावेळी रमेश वेणूगोपालस्वामी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्मिता रोकडे यांनी सूत्रसंचालन व मुग्धा देशपांडे यांनी आभार मानले.