Satara | परमेश्वराचे मूल्य जाणल्यास रुची उत्पन्न होईल
सातारा, (प्रतिनिधी) – समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातून जनाला उपदेश करताना मनाला अत्यंत प्रकर्षाने उपदेश केला आहे. मनाबाबतच का सांगितले, तर शरीरातील मन हे सर्वात न दिसणारे परंतु महत्त्वाचे इंद्रिय आहे. मन समजण्यास फार अवघड आहे. मनानेच मुक्ती ही मिळते आणि बंधत्वही उत्पन्न होते. मन मोक्षाला कारणीभूत आहे आणि बंधनालाही कारणीभूत आहे. आपल्याला मनामुळेच सुख, दुःख, आनंद, विचित्र मनस्थिती अनुभवता येते. त्याचा शरीरावर आणि बुद्धीवर प्रभाव पडतो.
आपल्याला ज्या वस्तूचे मूल्य माहीत असते, तिथेच रुची उत्पन्न होते. ज्याचे मूल्य कळत नाही तेथे आवड निर्माण होत नाही. परमेश्वराचे मूल्य जाणल्यास त्याबद्दल रूची उत्पन्न होईल, असे उद्गार माणिकनगर संस्थानचे परमपूज्य ज्ञानराज प्रभू महाराज यांनी सज्जनगड येथे काढले. श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवीय सोहळा व विष्णु पंचायतन यागाच्या तिसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना ज्ञानराज प्रभू यांनी अतिशय सहज, सोप्या भाषेत, सर्वांना कळेल असे मनाचे स्वरूप व परमात्म्याचे रूप ओळखण्यात बाबत विवेचन केले. प्रवचनापूर्वी श्रीमद माणिक प्रभू यांच्या पादुकांचे षोडशोपचार पूजन ब्रह्मवृंदांच्या हस्ते करून ज्ञानराज प्रभू महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
समर्थ भक्त अजय बुवा रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. प्रवचनात ज्ञानराज प्रभू यांनी शास्त्रात सांगितलेल्या साधन, साध्य व स्वरूप या तीन प्रकारच्या भक्तीचे अतिशय सुरेख विवेचन केले. सर्वात जास्त प्रेम मनुष्य हा शरीरावर करतो. साधन भक्ती ही निकृष्ट दर्जाची शास्त्रात मानली गेली आहे. परमात्म्याचे स्वरूप हे आपण स्वतः असून ते ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. तुमच्यातील चैतन्य हे तुमचे नाही तुम्ही खाता, झोपता, जागे होता हे सर्व परमेश्वराचीच लीला आहे. परमेश्वराकडून या लीला घडतात म्हणून तुम्ही जगात आहात. समर्थांच्या उपदेशा नुसार रामरायाचा आविष्कार हे तुमचे मनच आहे आणि म्हणूनच समर्थांनी मनाला उपदेश केले आहेत. आणि त्यातूनच चांगले वागण्याचा आदर्श कसा निर्माण होतो.
यावेळी वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांनी रामदास स्वामींच्या स्वरूप संप्रदायाचे प्रमुख असलेले शंकर हे कसे परंपरेशी अनुबद्धीत आहेत. याबाबत आपल्या प्रवचनातून विवेचन केले. ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांनी शनिवारी रात्री आपल्या गायन सेवेत समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या अनेक अभंगांची सुरेल आळवणी करत सज्जनगडावरील संध्याकाळ मंत्रमुग्ध केली.





