‘आपल्यातील प्रतिभा आपणच ओळखा’

नगर (प्रतिनिधी) –येथील अक्षर विचार प्रतिष्ठान आणि ए वन बायोटेक प्रा. लि. आयोजित अक्षर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अनुषंगाने माऊली सभागृह येथे आयोजित अक्षर संवाद कार्यक्रम शनिवार (दि.21) रोजी पार पडला.
अक्षर संवादच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात सिनेनाट्य मालिका लेखक दिग्दर्शक अमित बैचे, सिने नाट्य अभिनेत्री अनुया कळसकर, लेखक – दिग्दर्शक अमोल साळवे, सिने अभिनेता ख्वाडा ,बबन चित्रपट फेम भाऊसाहेब शिंदे, नाट्यकर्मी हरीश बारस्कर या मान्यवरांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संवादक प्रसाद बेडेकर यांनी अतिथींना सदर रंगचर्चेत बोलतं केलं.
नाट्य लेखन, दिग्दर्शन, संगीत संयोजन, प्रकाश योजना, व्यवस्थापन, रंगभूषा – वेशभूषा, नेपथ्य या अनुष्काने असणाऱ्या नाट्य तंत्र घटकांचा अभिनयासह नाटक सादर करताना विचार होतो. रंगकर्मींनी आपल्या अंगातील प्रतिभा ओळखून आपण या तांत्रिक बाबीत कोणत्या तंत्रात पारंगत आहोत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. नाटक मालिका आणि चित्रपट माध्यम प्रभावी आहे मात्र या तिनही कलांचे मार्ग वेगवेगळी आहेत. या माध्यमांवर मान्यवरांनी आपले सखोल विचार मांडले. आज नगरचे सांस्कृतिक क्षेत्र महाराष्ट्र आपल्या नावाचा ठसा उमटवत आहे. नगरच्या या कला वैभवाला भविष्यात उज्वल भविष्य आहे आणि त्यासाठी सर्व कलासक्त उपासकांनी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे, असे विचार अक्षर संवाद या सोहळ्यातून मांडण्यात आले. अक्षर विचार प्रतिष्ठान चे अध्यक्ष बलभीम पठारे, मयूर करंजे, पायल पठारे, वीरधवल करंजे, ऋषिकेश पठारे, आणि रितेश साळुंके यांनी मान्यवरांचे या प्रसंगी सत्कार केले.





