भारतीय शेअर बाजाराची भरारी, पडझडीनंतर अचानक तेजीचे कारण काय?

Stock market rally | भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी परतताना दिसत आहे. सातत्याच्या पडझडीनंतर मागील दोन सत्रांमध्ये शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे पाहायला मिळाले. आज (18 मार्च) 30 कंपन्यांचा बीएसई सेन्सेक्स 1131 अंकांनी वाढून 75,301 अंकांवर वर बंद झाला. यासोबतच निफ्टीमध्येही वाढ दिसून आली. 50 कंपन्यांचा एनएसई निफ्टी 325 अंकांनी वाढून 22834 वर बंद झाला.
सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात तेजी पाहायला मिळाल्याने गुंतवणूकदारांचा नफा देखील वाढला आहे. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप पुन्हा 400 लाख कोटी रुपयांच्या जवळ आले आहे. गेल्या काही काळापासून बाजारात घसरण झाल्यामुळे ते 400 लाख कोटी रुपयांच्या पातळीच्या खाली घसरले होते.
शेअर बाजारात तेजी येण्याची नक्की कारण काय?
- भारतीय शेअर बाजारात 3 महिन्यात करेक्शन पाहायला मिळाले. आता बहुतांश कंपन्यांचे व्हॅल्यूएशन मर्यादित स्तरावर आल्याने पुन्हा एकदा खरेदी वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक केली जात आहे. निफ्टी 50 चा सध्याचा पीई (price-to-earnings ratio) 20 वर आहे.
- भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा पाहायला मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या तिमाहीत कंपन्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा वाढली आहे. याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येत आहे.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारतासह जगभरातील शेअर बाजारावर याचा परिणाम दिसून आला होता. मात्र, आता यातून बाजार सावरताना दिसत आहे. एसबीआयच्या अहवालात देखील भारतावर टॅरिफचा फारसा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना देखील भारतीय बाजारावर फारसा परिणाम होणार नसल्याची अपेक्षा आहे.
- महागाईचा दर कमी होत असल्यामुळे RBI कडून धोरणात्मक व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. RBI ची चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक एप्रिल 7 ते 9 दरम्यान पार पडणार आहे. या बैठकीत व्याजदराबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत.
याशिवाय, बँकिंग, ऑटो आणि फायनेंशियल स्टॉक्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळेच भारतीय शेअर बाजाराचा आलेख वरच्या दिशेने चढताना दिसून येत आहे.




