नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील नागरिक लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदान करतात असा अनुभव आहे. एकीकडे ते विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला प्रचंड बहुमताने विजयी करतात तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीच्या सातही जागांवर भाजपच्या पदरात माप टाकतात. (Cm arvind Kejriwal’s arrest) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतल्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. या पक्षाला जवळपास ५० टक्के मते मिळाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय झाला. त्यांनी ७० पैकी ६७ जागा जिंकल्या. या पक्षालाही एकूण मतांच्या ५० टक्के मते त्या निवडणुकीत मिळाली होती. त्यामुळेच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक आपल्या मतांवर परिणाम करणार नाही असा विश्वास भाजपला वाटतो आहे. त्याचे कारण दिल्लीतील मतदार राष्ट्रीय आणि राज्याची निवडणूक याच्यात फारकत करतात असा भाजपचा तर्क आहे. आतापर्यंतचे आकडेही तसेच सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिल्लीच्या मतदारांनी भाजपला निश्चिंती दिली आहे. त्यांची खडतर परिक्षा पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असेल. अर्थात लोकसभेचे दिल्लीतील निकाल जर भाजपच्या अपेक्षेनुरूप लागले तरच. अन्यथा त्यांना दोन्ही निवडणुकांत धोका संभवू शकतो. झारखंडमधील रणनीती दिल्लीत जे आणि जसे ठरवले त्याच पध्दतीने झारखंडमधील निवडणुकीला भाजप सामोरा जातो आहे. त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरूंगात आहेत. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकांचा पॅटर्न पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी वाढत जाताना दिसते. २०१४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांच्या सहकार्याने झारखंड मुक्ती मोर्चा सत्तेत आला. मात्र त्याच वर्षातील लोकसभा निवडणुकीत झारखंडच्या १४ पैकी १२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. झामुमोला केवळ दोन जागांवर विजय मिळाला होता.केवळ २००९ च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर भाजपची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी सातत्याने सुधारली आहे. गेल्या निवडणुकीतही त्यांना ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या संभाव्य परिणामांबद्दल बोलताना एका इंग्रजी दैनिकाच्या वरिष्ठ महिला पत्रकारांनी सांगितले की आम आदमी पार्टीच्या प्रमुख नेत्यांना अटक करून भाजप दिल्लीत आपमध्ये नेतृत्वशून्यता आहे असे सिध्द करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामागे त्यांची रणनीती असू शकते की भाजपच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे आप बेजार होऊन कोणती रणनीतीच तयार करू शकणार नाही आणि अखेर फुटीच्या उंबरठ्यावर जाउन पाहोचेल. काहीसा असाच प्रकार गेल्या दोन दिवसांत आपमध्ये पाहायला मिळाला. केजरीवाल यांच्या अटकेनंतर या पक्षाचे पंजाबमधील एक खासदार आणि एक आमदार भाजपच्या तंबुत दाखल झाले आहे. झारखंडमध्येही गेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने केवळ एक जागा जिंकली होती. त्यांच्या सीता सोरेन विजयी झाल्या होत्या. त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.