Truth Social platform | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलमध्ये सहभागी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील हा आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ट्रम्प अनेकदा महत्त्वाची माहिती देण्यासाठी ट्रुथ सोशलचा वापर करतात.
नुकतेच प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली. या 3 तासांच्या पॉडकास्टनंतर पंतप्रधान मोदी आथा ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर ज्वाइन झाले आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की, ट्रूथ सोशलवर आल्याचा आनंद झाला. येथील सर्व उत्साही लोकांशी जोडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.”
अन्य एका पोस्टमध्ये मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी मोदी व फ्रीडमन यांचा पॉडकास्ट शेअर केल्याबद्दल आभार मानले. पंतप्रधान मोदी हे एक्स (ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्म्सवर प्रचंड सक्रिय असतात. या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. आता ट्रूथ सोशलवर सहभागी झाल्याने या प्लॅटफॉर्मची देखील विशेष चर्चा रंगली आहे.
ट्रूथ सोशल काय आहे?
जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर (एक्स), फेसबुक आणि यूट्यूबवर या प्लॅटफॉर्म्सने त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये स्वतःचाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला
ट्रूथ सोशल हा ट्रम्प मीडिया मालकीचा प्लॅटफॉर्म आहे. थोडक्यात, याची मालकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच आहे. हा प्लॅटफॉर्म काहीसा ट्विटरप्रमाणेच आहे. या प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या पोस्टला ‘Truths’ म्हटले जाते. तर रिपोस्टला ‘Re-Truths’ आणि जाहिरातींना ‘Sponsored Truths’ असे म्हणतात. या प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हीडिओसह इतर माहिती शेअर करता येते.
दरम्यान, जरीही हा ट्रम्प यांच्या मालकीचा प्लॅटफॉर्म असला तरीही ट्रूथ सोशलला जगभरात फारशी लोकप्रियता मिळालेली नाही. एकीकडे ट्रम्प यांचे ट्विटरवर जवळपास 10 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत, तर दुसरीकडे ट्रूथ सोशलवर हा आकडा 1 कोटींपेक्षा कमी आहे.
ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर कोणीही सहभागी होऊ शकते. यूजर्स अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड करू शकतात. किंवा truthsocial.com या साइटला भेट देऊन ट्रुथ सोशलमध्ये सहभागी होता येईल.