अरुण गोखले पंगतीतली पाने वाढून झाली. शेवटच्या पानातील वरण भातावर तुपाची धार पडली आणि दुसऱ्याच क्षणी यजमानांनी उच्च स्वरात सुरुवात केली… “वदनि कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे… जीवन करी जिवीत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म। उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म।। जय जय रघुवीर समर्थ’ हं आता करा सुरुवात. “मंडळी! भोजन कसं सावकाश होऊ द्या’ यजमानांनी विनंती केली आणि मग मंडळींनी भोजनास प्रारंभ केला. आपल्या भारतीय संस्कृतीने माणसांच्या नित्य भोजन या कार्याची सरळ सरळ एखाद्या पवित्र यज्ञकर्माशी तुलना केलेली आहे. ती सार्थही आहे, कारण भागवतात उद्धवाला काय किंवा गीतेत अर्जुनाला काय! भगवान श्री कृष्णांनी पृथ्वीवरील अग्नी हे माझेच रूप आहे. तर दुसरीकडे प्रत्येक प्राणिमात्राच्या उदरातला जठराग्नी हा मीच आहे, असे सांगितलेले आहे. हाच भाग सर्मर्थांनी सुद्धा आपल्या श्लोकातून स्पष्ट केलेला आहे. ते म्हणतात की भोजन हे तुम्ही कसे करा, तर ते एक तुमचे नित्य यज्ञकर्म आहे, ही पवित्र भावना त्यामागे राहू द्या. ज्याप्रमाणे यज्ञात एकेक आहुती ही मंत्रासोबत टाकली जाते, तसेच प्रत्येक घासागणिक ईश्वराचे नाम घेऊन तो घास तुम्ही पोटात घाला. भोजन कसे करावे ह्याचे तर एक वेगळेच शास्त्र आपल्याकडे सांगितलेले आहे. जेवताना चित्तवृत्ती शांत, प्रसन्न ठेवणे, जेवताना घाई न करणे, तोंडाचा मचमच आवाज न काढणे, अन्न खाली न सांडणे, पानात अन्न न टाकणे, या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत. ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे संपन्न केलेल्या यज्ञकर्माचे फळ प्रसाद रूपाने आपल्यास मिळते. त्या प्रमाणेच भोजन हे सुद्धा एक यज्ञकर्म मानून ते व्यवस्थितपणे केले तर त्यापासून आपल्याला तृप्ती, समाधान, आनंद, शक्ती, बल, उत्साह, स्फूर्ती ह्या गोष्टी प्राप्त होतात. तृप्त आणि संतुष्ट झालेल्या व्यक्तीच्या हृदयातून निघणारे आशीर्वाद अन्नदात्याच्या पदरात पुण्य देऊन जातात. घरच्या बाबतीतही घरच्या सर्व लोकांनी सुखासमाधानाने भोजन करून तृप्तीची ढेकर दिली तर घरच्या मालकिणीलाही केलेल्या स्वयंपाकाचे सार्थक, श्रमाचे चीज झाले असे वाटते. भोजन देणारी आणि भोजन करणारी दोघेही तृप्त झाले, तरच त्या भोजनास खरा अर्थ असतो. नाही का?