शेअर निर्देशांक कोसळण्यामागे आहेत ‘ही’ 3 मोठी कारणं

मुंबई – देशातील आणि परदेशातील नकारात्मक घटनाक्रमामुळे तीन महिन्यापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले आहेत. असे असतानाच शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत अनेक नकारात्मक बाबी समोर येत आहेत. त्यामुळे निराश गुंतवणूकदाराकडून सोमवारी शेअर बाजारात तुफान विक्री झाली. निर्देशांक तब्बल दीड टक्क्यांनी कोसळले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,258 अंकांनी कोसळून 77,964 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 388 अंकांनी म्हणजे 1.62 टक्क्यांनी कोसळून 23,616 अंकावर बंद झाला.
लवकरच भारतीय कंपन्या तिसर्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहेत. त्याचबरोबर तिसर्या तिमाहीच्या राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे. याबाबत गुंतवणूकदार फारसे आशीर्वाद नसल्याचे दिसून येत आहे. भारतीय रुपयाची दाणादान होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणे परवडत नाही. अशा परिस्थितीत ऑक्टोबरपासून या गुंतवणूकदारांनी एकतर्फी विक्री केल्यामुळे निर्देशांकात घट होत आहे.
एचएमपीव्ही विषाणू –
जग करोनातून अजून पुरते सावरले नसतानाच चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरस वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषाणूची परिणामकारकता किती आहे याचे अजून मूल्यांकन झाले नसले तरी भारतीय शेअर बाजारात या संदर्भात संवेदनाशील वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खबरदारी म्हणून बरेच गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत आहे. प्राप्त माहितीनुसार हा एक सर्दीचा प्रकार असूनही गुंतवणूकदार त्याबाबत जास्त साशंक झाल्यामुळे विक्री करीत आहेत.
रुपयाचे अवमूल्यन
भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेबाबत नकारात्मक चित्र निर्माण झाल्यामुळे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वेगाने कमकुवत होत आहे. रिझर्व बँकेने बरेच डॉलर खर्च करूनही रुपयाचे मूल्य घसरत आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक परवडत नाही. त्यामुळे हे गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक ऑक्टोबरपासून काढून घेत आहेत. जानेवारीतील तीन दिवसात या गुंतवणूकदारांनी 4,285 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. अजूनही रुपयाचे मूल्य स्थिर होताना दिसत नाही. याचा शेअर बाजारावर परिणाम होत आहे.
ट्रम्प यांचा पदभार
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी विविध देशाबरोबर व्यापारी युद्धाची भाषा केली आहे. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जागतिक व्यापारावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दरम्यानच्या काळात डॉलर वधारत असल्यामुळे रुपयाचा भाव कमी होत आहे. ट्रम्प यांच्या धोरणाचा काय परिणाम होईल हे कोणालाही सांगता येत नसल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदार विक्री करीत आहेत.
जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार
भारताचा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा निर्देशांक घसरत आहे. दुसर्या तिमाहीत विकासदर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत तिसर्या तिमाहितीच्या विकासदराची आकडेवारी केंद्र सरकार मंगळवारी जाहीर करणार आहे. ही आकडेवारी नकारात्मक असण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोमवारी तुफान विक्री झाली. तसेच तिसर्या तिमाहीचे कंपन्याचे ताळेबंद जाहीर होणे सुरू झाले आहे. ते आशादायक नसल्याची भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली आहे.




