Mahila Samman Savings Certificate: गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळावा व कोणतेही नुकसान होऊ नये असे प्रत्येकाला वाटते. यामुळे अनेकजण स्टॉक्स, सोने यामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी मुदत ठेवीला प्राधान्य देतात. मात्र, मुदत ठेवीवर मिळणारे व्याज हे कमी असते. तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना एक चांगला पर्याय आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला एफडीपेक्षाही अधिक परतावा मिळेल.
या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या योजनेंतर्गत महिला आणि अल्पवयीन मुलीच्या नावे पैसे जमा करता येतात. या योजनेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी यामध्ये गुंतवणूक करू शकते.
किती रक्कम जमा करू शकता?
या योजनेत महिला कमीत कमी 1 हजार रुपये ते जास्तीत जास्त रु 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तसेच, तुमचे नियमित खाते असल्यास दुसरे खाते 3 महिन्यांनी उघडावे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले अथवा आधीच पैसे काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल.
गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल?
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 7.5% वार्षिक परतावा दिला जातो. सध्या SBI च्या दोन वर्षांच्या FD वर सर्वसामान्यपणे 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.30 टक्के व्याजदर दिले जाते. अॅक्सिस, एचडीएफसी बँकेच्या एफडीवर देखील जवळपास 6 ते 7 टक्के व्याज दिले जाते. म्हणजेच, या योजनेवर बँकेच्या एफडीपेक्षा जास्त परतावा दिला जात आहे.
2 लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत 2 वर्षांच्या मुदतीसाठी 2 लाख रुपये गुंतवणूक केल्यास, कालावाधी संपल्यावर तुम्हाला 2,32,044 रुपये मिळतील. म्हणजेच, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 32,044 रुपये व्याज प्राप्त होईल. नियमानुसार, एका वर्षानंतर या खात्यातून पैसे काढता येतात. एका वर्षानंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकता.