पुणे – क्रिकेट नेक्स्ट अकादमी तर्फे आयोजित पहिल्या नॉक 99 करंडक अजिंक्यपद 19 वर्षांखालील टी-20 क्रिकेट स्पर्धेत गौरव खैरे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सेंचुरी क्रिकेट अकादमी संघाने ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमीचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
कटारीया हायस्कूल मैदान, मुकुंदनगर येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलियंट्स क्रिकेट अकादमीने 114 धावा धावफलकावर लावल्या. रौनक दुबे याने 56 धावांची खेळी केली. गणेश बाड याने 23 धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. गौरव खैरे याने 12 धावात 3 गडी बाद केले. केदार बजाज आणि हर्ष सी. यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे आव्हान सेंचुरी क्रिकेट अकादमीने 16.1 षटकांमध्ये व 5 गडी गमावून पूर्ण केले.
नील गांधी (नाबाद 37 धावा) आणि पार्थ देवोकर (32 धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि संयोजक विक्रम देशमुख, संघांचे प्रशिक्षक आदी उपस्थित होते.