Knife Attack – शिवीगाळ का केली? असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला झाल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गोळेवस्ती परिसरात रविवारी (दि. 19) सायंकाळी घडली. या प्रकरणी पती-पत्नीविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लक्ष्मण झोंबाडे (वय 39, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विकास सायसराव मोहिते आणि हेमा विकास मोहिते अशी आरोपींची नावे आहेत. रविवारी सायंकाळी झोंबाडे घराबाहेर असताना त्यांच्या पत्नीने फोन करून शेजारी विकास मोहिते शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर झोंबाडे घरी परत येऊन शिवीगाळ का केली? असा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरासमोर गेले. यावेळी आरोपी दाम्पत्याने पुन्हा शिवीगाळ सुरू केली. दरम्यान, विकास मोहिते याने घरातून चाकू आणून झोंबाडे यांच्या कपाळावर वार केल्याने ते जखमी झाले. तसेच हेमा मोहिते हिने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या वेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले मिथुन रंगनाथ वाघमारे यांच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, आरोपी विकास मोहिते याच्यावर यापूर्वीही मारहाण, तोडफोड व धमकी प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण गोसावी करीत आहेत.