नवी दिल्ली : भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. गेल्या वर्षी २,०६,००० भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले. हा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आकडा आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२२ पासून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. राज्यसभेचे खासदार प्रकाश करैत यांनी गेल्या पाच वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची माहिती मागितली होती. त्यावर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, २०११ ते २०२४ दरम्यान भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतलेल्या लोकसंख्येची माहिती दिली. २०२० मध्ये ८५,२५६ लोकांनी, २०२१ मध्ये १६३,३७० लोकांनी, २०२२ मध्ये २२५,६२० लोकांनी, २०२३ मध्ये २१६,२१९ लोकांनी आणि २०२४ मध्ये २०६,३७८ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत अंदाजे ५ टक्के घट झाली आहे. शिवाय, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्येही ही संख्या कमी झाली. २०११ ते २०१९ पर्यंत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्या लोकांची आकडेवारी देखील जारी केली. त्यामुळे तुलनात्मक आढावा घेता आला. २०११ मध्ये १२२,८१९ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. २०१४ मध्ये, ज्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्या वर्षी ही संख्या थोडी वाढून १२९,३२८ झाली. २०१९ मध्ये, ज्या वर्षी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्या वर्षी ही संख्या आणखी वाढली. २०१९ मध्ये १,४४,०१७ भारतीय नागरिकांनी त्यांचे नागरिकत्व सोडले.