ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्यांना डच्चू ; नगरसेवक मनोज कोटक यांना लोकसभेची उमेदवारी

मुुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल आरोप करणे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसैनिकांच्या कडव्या विरोधानंतर भाजपाने नमते घेत अखेर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सोमय्यांना डच्चू दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमिवर शिवसेना-भाजपाची युती झाली. ही युती करताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्यांचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या उमेदवारीवर तीव्र नापसंती व्यक्त केल्याची चर्चा होती. अखेर या चर्चेवर भाजपानेच शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मुंबईतील सहा मतदारसंघापैकी भाजपाकडील असलेल्या तीनही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहिर झाली होती. परंतु, ईशान्य मुंबईतील उमेदवाराचे नाव जाहिर केले नव्हते. ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिकांनी टोकाची भूमिका घेत जोरदार विरोध केला होता. शिवसेनेची नाराजी पाहता अखेर भाजपाने बुधवारी ईशान्य मुंबईतून नगरसेवक मनोज कोटक यांची उमेदवारी जाहिर केली.

2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत सोमैय्या यांनी शिवसेनेवर टीका करताना थेट “मातोश्री’ला लक्ष्य केले होते. वांद्‍र्यांच्या साहेबांची भूमाफियाशी संबंध असल्याचा आरोप करीत किरीटी सोमय्यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. ही टिका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपाशी युती करताना ईशान्य मुंबईतून सोमय्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास शिवसैनिकांचा विरोध होता. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला होता. एवढेच नव्हे त्यांचा प्रचार करण्यासही शिवसैनिकांनी नकार दिला होता.

सोमैय्यांसाठी भाजपाने शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. सोमैय्या यांनी “मातोश्री’ची भेटही मागितली होती. मात्र सोमैय्या यांना भेटीची वेळ नाकारण्यात आली होती. शिवसेनेचा विरोध लक्षात घेता भाजपाने सोमैया यांना लोकसभा निवडणूकीतून डच्चू दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.