Kiran Mane : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं काल (दि. १०) वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे.
तसेत भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. या निकालांनंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून, दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
दरम्यान, अश्यातच काही दिवसांपूर्वीच शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणारे अभिनेते किरण माने यांनी या निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे किरण माने यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक-दोन पोस्ट शेअर केल्या असून, या लढाईत आपण उद्धव ठाकरेंसोबत असून त्यांना साथ देणार असल्याचं म्हटलं आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “औरंगजेबाने या मुलूखावर ५१ वर्ष राज्य केलं होतं. तरीही आज हा मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदनीय मानतो. पैसा आणि दहशतीच्या बळावर राजकीय सत्ता ‘हिसकावणं’ सोपं असतं…
पण रयतेची मनं जिंकणं सोपं नसतं भावांनो. मुठभर मावळे हातात असून बलाढ्य शक्तीशी टक्कर देणारा जिगरबाजच जनतेच्या मनावर वर्षानुवर्ष राज्य करतो.! या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.