किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्यावर चित्रपटात वर्णी

मुंबई – अभिनेते किरण माने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता “स्टार प्रवाह’ वाहिनीवरील “मुलगी झाली हो’ या मालिकेतून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात वाहिनीने निवेदन देत भूमिका मांडली आहे.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं. किरण माने यांना तडकाफडकी काढून टाकल्यामुळे अनेक दिवस हा मुदा चर्चेत होता. असं असताना आता किरण माने यांची सिनेमात वर्णी लागली आहे.
किरण माने यांनी नवी फेसबुक पोस्ट करत मालिकेतून काढल्यानंतर ‘रावरंभा’ या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या याचे चित्रीकरण सुरु असल्याचा माहिती दिली आहे. रावरंभा हा सिनेमा संजय जाधव दिग्दर्शित हा सिनेमा ऐतिहासिक प्रेमकहाणीवर आधारित आहे. या सिनेमात अनेक कलाकारण असून यामध्ये किरण माने यांचीही वर्णी लागली आहे.
नुकतंच कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.अनुप जगदाळे दिग्दर्शित “रावरंभा’ या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय जाधव निभावणार आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती शशिकांत शीला भाऊसाहेब पवार करत आहेत.
इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे.


