Pimpri : बालवाडीच्या वर्गखोल्या झाल्या आकर्षक

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने विशेष मोहीम हाती घेत महापालिकेच्या सर्व २११ बालवाड्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या उपक्रमामुळे सहा हजारांहून अधिक बालकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार, आकर्षक आणि शिकण्यासाठी अनुकूल वर्गखोल्या मिळाल्या आहेत.
बालवाडीतील बालकांसाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेने पूर्व बाल्यावस्था काळजी आणि शिक्षण या रणनीतीवर आधारित विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे बालकाची साक्षरता, अंकज्ञान आणि विविध कौशल्यांमध्ये २० ते २४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या साध्या वर्गखोल्या आता खेळ आधारित शिक्षण, कथाकथन, प्रत्यक्ष अनुभव देणारे चैतन्यशील वातावरणासोबतच एकप्रकारे बाल केंद्रित ज्ञानकेंद्रांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत.
बालवाड्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षक, पर्यवेक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदींनी आपले योगदान दिले. संबंधितांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करुन त्यामध्ये नियमित मासिक प्रशिक्षण, विशेष शिक्षण साहित्य आणि शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यातील सकारात्मक संबंधांमुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास मदत झाली. सध्या, १६ मास्टर ट्रेनर्स आणि ९ पर्यवेक्षक सर्व बालवाड्यांमध्ये सदर धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान देत आहेत.
महापालिकांच्या सर्वच बालवाड्यांमध्ये राबविलेल्या धोरणामुळे लक्षणीय बदल झाले आहे. यामुळे आता बालवाडीतील मुले खेळाद्वारे इंग्रजी आणि विज्ञानाचे धडे गिरवत असून डॉक्टर आणि पोलीस अधिकारी मुलांशी संवाद साधत असून मुले खेळणी, ब्लॉक्स व सर्जनशील खेळांद्वारे कौशल्ये विकसित करीत आहेत. या उपक्रमामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सामाजिक-भावनिक शिक्षण आणि सुरक्षित स्पर्शाचे प्रशिक्षण दिल्यामुळे मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळत आहे.
आदर्श बालवाडीसाठी शिक्षण विभाग घेणार पुढाकार
शिक्षण विभागाने बालवाडींच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य आराखड्यानुसार विशेष हस्तपुस्तिका तयार केली असून त्याची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने दखल घेतली. याचबरोबर महापालिका चालू शैक्षणिक वर्षापासून २० बालवाडी सीएसआर फंडातून व २० बालवाडी महापालिकेच्या पुढाकारातून आदर्श बालवाडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेणार आहे.
प्रत्येक महिन्याला होणाऱ्या क्लस्टरमुळे अभ्यासक्रमात व शिकविण्याच्या पद्धतीमध्ये एकसूत्रता दिसून येते आहे. शिक्षिका प्रत्येक महिन्याची थिम लक्षात घेऊन दररोज वर्गाचे नियोजन करताना दिसत आहेत, व प्रत्येक बालकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवत आहेत.
– यमुना खंडागळे, सहाय्यक समन्वयिका, पूर्व प्राथमिक विभाग





