प्यांगयॉंग – उत्तर कोरियातील एका महिलेने थेट अमेरिकेच्या नव्या प्रशासनाला आणि नव्या अध्यक्षांना जाहीर धमकी दिली आहे. पुढची चार वर्षे तुम्हाला शांततेत झोपायचे असेल तर दारूगोळ्यापासून लांब रहा, त्याचा वास या भागात येउ देउ नका असे या महिलेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाच बजावले आहे.
अमेरिकेला धमकावणारी ही महिला अन्य कोणी नसून उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग आहे. ती उन यांची प्रमुख सल्लागारही असल्याचे मानले जाते.
अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर त्या देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री द. कोरियात दाखल झाले आहेत. ते स्थितीचा नव्याने आढावा घेत आहेत. त्यातच अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराचा संयुक्त युध्दाभ्यासही सुरू झाला आहे. या घटनांमुळे उत्तर कोरियाचे पित्त खवळले आहे. सामान्यत: अशा काही घटना घडल्या की उत्तर कोरिया एखाद्या क्षेपणास्त्राची चाचणी घेते किंवा किम जोंग उन एखादी धमकी जारी करतात.
यावेळी त्यांनी स्वत: काही केले नसून त्यांच्या बहिणीनेच थेट अमेरिकेच्या अध्यक्षांना धमकी दिली आहे. तुमच्याकडून कोणतेही चिथावणीखोर कृत्य यापुढे होता कामा नये. पुढचे चार वर्षे जर तुम्हाला शांततेत झोपायचे असेल तर आमच्या भागात दारूगोळ्याचा कोणताही वास येणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या असे त्यांनी बजावले आहे.
युध्दाभ्यास, शत्रुत्व आणि सहकार्य आणि चर्चा या गोष्टी एकाच वेळी होउ शकत नाहीत. आम्हाला दक्षिण कोरियासोबत सहकार्य करायचे नसेल तर त्या देशासोबत 2018 मध्ये जो द्विपक्षीय सहकार्य करार केला आहे त्यातून बाहेर पडण्याचा विचार आम्ही करू. दोन्ही कोरियांतील संबंधांसाठी सत्तारूढ पक्षाने दशकभरापूर्वी जी समिती स्थापन केली आहे, तीही आम्ही बरखास्त करू असा इशारा किम यो जोंग यांनी दिला आहे.
अमेरिका आणि द. कोरिया यांचा संयुक्त युध्दाभ्यास अगोदरपासूनच उत्तर कोरियाला अमान्य राहीला आहे. जर दोन्ही देशांनी हे थांबवले नाही, तर दोन्ही कोरियांतील शत्रुत्व वाढेल असा इशारा किम जोंग उन यांनीही यापूर्वी दिला आहे.