Deepak Kesarkar | Kidnapper Rohit Arya : मुंबईतील पवई भागात गुरुवारी हाय व्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाल. पवईमध्ये एका व्यक्तीने ऑडिशनसाठी आलेल्या तब्बल १७ मुलांना ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली आणि तातडीने विशेष बचाव मोहीम सुरू केली. या कारवाईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी रोहित आर्याने पोलिसांवर गोळीबार केला होता, त्यानंतर पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रत्युत्तराच्या गोळीबारात रोहित जखमी झाला. उपचारादरम्यान रोहित आर्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी रोहित आर्य याने शासनाकडून 2 कोटी रुपये मिळाले नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यासाठी त्याने माजी मंत्री दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना उपोषण केलं होतं. त्याने आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं घृणास्पद कृत्य केलं. मात्र, आता रोहित आर्यच्या या कृत्यानंतर दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आपण रोहित आर्य याला स्वत: चेकने पैसे दिले होते’, असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना केला. “रोहित आर्य हे स्वच्छा मॉनिटर नावाची एक स्किम चालवत होते. ते शासनाच्या मोहीमेत सहभागी झाले होते. त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं. पण रोहित आर्य यांचं म्हणणं होतं की, आपण अशी कुठल्याही प्रकारची फी वसूल केलेली नाही. याबाबत त्यांनी डिपार्टमेंटसोबत बोलून विषय सोडवायला हवा होता. अशाप्रकारे मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं आहे”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली. “मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा पर्सनली त्यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिलेले आहेत. पण सरकारच्या पेमेंटसाठी सर्व फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो क्लेम आहे की, 2 कोटी मला येणं आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करावी आणि त्या संदर्भातील कागदपत्रे सादर करावेत”, असं दीपक केसरकर म्हणाले. “रोहित आर्या हा मनोरुग्ण आहे असं बोलणं योग्य नाही. त्यांनी याआधी उपोषण केलं होतं. त्यामुळे ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते असं दिसत नाही. शासनाकडे सिद्ध करावं लागतं की, मी हे काम केलं. त्यांनी सिद्ध करावं आणि पैसे घ्यावे. शासनाच्या नियमांचं पालन करावं लागतं. शासनाचे पैसे बुडत नाहीत. त्यांनी शासनाकडे आपली बाजू मांडली पाहिजे. नियमाप्रमाणे पैसे मिळत असतात. नियमाप्रमाणे काही पैसे मिळाले असतील. मी वैयक्तिगत सहानुभूती म्हणून स्वत: पैसे दिले होते. शासनासाठी काम करताना डॉक्यूमेंट द्यावे लागतात आणि आपले बिलं मिळवावी लागतात”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. ‘रॉ स्टुडिओ’मध्ये नेमकं काय घडलं? पवई येथील रॉ स्टुडिओमध्ये एका ऑडिशनसाठी सुमारे 100 लहान मुले जमली होती. याच दरम्यान, रोहितने त्यापैकी सुमारे 20-25 मुलांना ओलीस बनवले. या सर्व मुलांचे वय हे 15 च्या जवळपास होते. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित हा मानसिकरित्या अस्वस्थ होता. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस दलाचे जवान आणि विशेष कमांडो तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वप्रथम आरोपीशी बोलणी सुरू केली. आरोपी काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे मागत होता, ज्याचा प्रतिसाद देऊन मुलांना सुरक्षित सोडवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. विशेष कमांडो पथकांनी त्वरीत कारवाई करत आपला ऑपरेशन सुरू केले आणि सर्व ओलीस विद्यार्थ्यांची सुटका केली.