पिंपरी – लग्नासाठी तरुणीचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे सोमवारी सकाळी घडली.
अमोल अरविंद भिलारे (वय 27, रा. वायसीएम रुग्णालयासमोर, पिंपरी), हर्षल जिरेकर (वय 30, रा. पिंपरी) आणि त्यांचा एक अनोळखी मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 27 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. 16) भोसरी पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाणीची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अमोल भिलारे याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी भिलारे यांचे गेल्या सहा वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. सोमवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना भोसरीतून राखाडी रंगाच्या मोटारीत जबदस्तीने बसवून लग्न करण्यासाठी पळवून नेले. मात्र तरुणीने त्यास जोरदार विरोध केल्याने चालत्या मोटारीतून तिला ढकलून देण्यात आले. यामध्ये तरुणीला मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.