पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शेअर मार्केटमधून जास्त फायदा करून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवलेले पैसे परत मागितल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्टमधून अपहरण केले. त्यानंतर एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सात जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास भानुदास शितोळे (३४, रा. पुणे व्हिले सोसायटी, पुनावळे, पिंपरी-चिंचवड) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे. यावरून अमित रोकडे, दयानंद रोकडे (दोघेही रा. अहमदपूर, लातूर), अमोल क्षीरसागर (रा. पर्वती) व चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला असून, शितोळे यांनी मंगळवारी (दि. २८) फिर्याद दिली आहे. शितोळे हे नोकरी करतात. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचा फायदा घेऊन आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. आरोपींनी सुरुवातीला परतावा दिला. त्यानंतर फिर्यादींनी त्यांचे नातेवाईक आणि मित्रांकडून सहा कोटी रुपये जमा करून आरोपींना दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नाही. त्यामुळे शितोळे यांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला होता. याचा राग आल्याने आरोपींनी संगनमत करून शितोळे यांना कदमवाक वस्ती येथील मनाली रिसॉर्ट येथे बोलवून घेतले. शितोळे त्या ठिकाणी गेले असता त्यांचे एका कारमधून आलेल्या अनोळखी चार जणांनी जबरदस्तीने अपहरण केले. त्यानंतर शितोळे यांना पुणे- सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने नेले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, शितोळे यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर अनोळखी चार जणांनी त्यांना सोडून दिले. यानंतर शितोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.