Kiara Advani : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा अनुभवत आहे. गेल्या महिन्यात ती आणि तिचा पती, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, पालक बनले. १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावरून दोघांनीही ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. अलीकडेच कियाराने इन्स्टाग्रामवर लेकीबद्दलची एक भावनिक पोस्ट शेअर केली. रात्री उशिरा पोस्ट करताना तिने लिहिले, “मी तुझे डायपर बदलते, पण तू माझं जग बदललं आहे.” या एका वाक्यातून तिने पालकत्वातील आनंद आणि भावना व्यक्त केल्या. चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळींनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला. काहींनी तिला “बेस्ट मॉम” म्हटलं, तर काहींनी बाळासाठीही प्रेमाचे संदेश पाठवले. कियारा आणि सिद्धार्थ यांची प्रेमकहाणी २०१८ मध्ये एका चित्रपटाच्या पार्टीत सुरू झाली. काही वर्षांच्या ओळखी आणि नात्यानंतर, २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात ते एकत्र दिसले. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दोघांनी जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. कियारा लवकरच यशराज फिल्म्सच्या ‘वॉर २’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार असून, चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शनने भरलेला हा सिनेमा, हृतिक-एनटीआर यांची दमदार फाईट आणि हृतिक-कियारा यांची रोमँटिक केमिस्ट्री यामुळे आधीच चर्चेत आहे. सध्या कियारा आईपणाचा आनंद घेत असून, तिच्या पोस्टमधून ती आपल्या लेकीसाठी किती भावूक आहे, हे स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा हा गोड आणि भावनिक अंदाज चाहत्यांच्या मनाला भावतोय.