Kiara Advani: आई झाल्यानंतर कियारा अडवाणीचा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक; ‘या’ दिग्दर्शिकासोबत करणार नवा चित्रपट!
Kiara Advani : मात्र कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे. माध्यमांतील माहितीनुसार, मुलीच्या जन्मानंतर सुमारे सात महिन्यांनी तिने नव्या स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत ती नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी करू शकते, अशी माहिती आहे.

Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटांपासून दूर होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये तिने मुलगी सरायाहला जन्म दिला.
त्यानंतर तिने मातृत्व आणि कुटुंबाला प्राधान्य देत अभिनयातून ब्रेक घेतला होता. या काळात तिने कोणताही नवा चित्रपट साइन केला नव्हता.
आता मात्र कियारा पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार असल्याची चर्चा आहे. माध्यमांतील माहितीनुसार, मुलीच्या जन्मानंतर सुमारे सात महिन्यांनी तिने नव्या स्क्रिप्ट्स ऐकायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी यांच्यासोबत ती नव्या चित्रपटासाठी हातमिळवणी करू शकते, अशी माहिती आहे. अश्विनी यांनी याआधी ‘पंगा’, ‘नील बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ सारखे महिला-केंद्री चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
या नव्या चित्रपटात कियारा एक दमदार आणि केंद्रस्थानी असलेली भूमिका साकारू शकते. मात्र, या प्रोजेक्टबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही इंडस्ट्रीमध्ये या संभाव्य सहकार्याबद्दल उत्सुकता आहे.
मातृत्व रजेदरम्यान कियाराला काही चित्रपट सोडावे लागले. उदाहरणार्थ, ‘शक्ती शालिनी’ हा चित्रपट आता दुसऱ्या अभिनेत्रीसमवेत तयार होत आहे. तरीदेखील कियाराची लोकप्रियता कायम आहे आणि चाहत्यांना तिच्या पुनरागमनाची उत्सुकता आहे.
दरम्यान, कियाराचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार यशसोबत दिसणार असून ‘नाडिया’ ही भूमिका साकारणार आहे. त्यामुळे कियाराची ही नवी सुरुवात किती दमदार ठरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.







