Khopoli News – खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी गुरुवारी (दि. २३) प्रभाग क्रमांक १४ आणि १५ मध्ये भेट देत पाहणी केली. हद्दीत वाढत्या लोकवस्तीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मूलभूत सुविधा पोहोचविणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या असून त्या तातडीने सोडविण्याचे आदेश नगराध्यक्षांनी संबंधित विभागांना दिले. नगराध्यक्ष थेट प्रभागात येऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पाटणकर चौकातील वाहतुकीच्या समस्येकडे विशेष लक्ष देत, रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच काटरंग चौकात सुरू असलेल्या नवीन पाणी पाइपलाइन कामाची पाहणी करून काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मोगलवाडी परिसरात पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी डीपी रस्त्यालगत साचत असल्याने त्यावर योग्य निचरा व्यवस्था करण्यासाठी बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या. याशिवाय गटारावर अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीची दखल घेत संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. यावेळी नगरसेवक निजामुद्दीन जळगावकर, विनिता कांबळी, संदीप पाटील, किशोर पाटील तसेच बांधकाम, पाणीपुरवठा आणि नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.