Khopoli News – खोपोली शहरात कचरा संकलनासाठीची घंटागाडी वेळेवर येत नसल्याने आणि अनियोजित कारभारामुळे शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ४५ दिवसांची सुधारणा मुदत देऊनही परिस्थितीत बदल झाला नाही तर ठेका रद्द करावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. सुनिल पाटील यांनी खोपोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर डॉ. पाटील यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि घरगुती कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या मनमानीमुळे घंटागाड्या वेळेवर फिरत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिलांना अनेकदा तासन्तास घंटागाडीची प्रतीक्षा करावी लागते. काहीवेळा घंटागाडी न आल्याने नागरिकांना कचरा पुन्हा घरात न्यावा लागतो, तर काही ठिकाणी तोच कचरा रस्त्यावर किंवा गटारांमध्ये टाकला जात असल्याने अस्वच्छतेची समस्या निर्माण होत आहे. खोपोली शहरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होणे अपेक्षित असताना, ठेकेदाराकडून समाधानकारक सेवा मिळत नसल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी केला. शहरातील विविध भागांमध्ये कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून शहराचे बकाल रूप होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या वारंवार तक्रारी केल्या जात असूनही संबंधित ठेकेदार फोन उचलत नसल्याचा आरोप करत प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चांगलाच गाजला असून नागरिकांनी डॉ. सुनिल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.