प्रभात वृत्तसेवा खालापूर – शहरात आज निवडणूक मतदान होत असून संपूर्ण शहरात मोठी उत्सुकता पसरली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू ठेवली. यात मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे गट) – भाजप – आरपीआय महायुतीचे कुलदीपक शेंडे आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) – शिवसेना (ठाकरे गट) – शेकाप परिवर्तन विकास आघाडीचे डॉ. सुनील पाटील यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. या पदासाठी सात उमेदवार रिंगणात असले तरी ही लढत द्विपक्षीय बनली आहे. नगरसेवकांच्या ३१ जागांसाठी ११८ उमेदवार मैदानात असून प्रत्येक प्रभागात तुफान चुरस निर्माण झाली आहे. संभाव्य गालबोट टाळण्यासाठी पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. कधीकाळी महाराष्ट्रातील क्रमांक दोनची श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या खोपोलीची औद्योगिक घसरण झाली असली, तरी राजकीय पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. प्रत्येक पक्षाने ही नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. प्रचारसभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या, तर उमेदवारांनी खालच्या पातळीवर जाऊ न देता आपणच शहराच्या विकासासाठी योग्य असल्याचे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आजच्या मतदानातून मतदार कोणाला पसंती देणार, कोणाचे वर्चस्व ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष तसेच ३१ नगरसेवक पदांसाठी आज खोपोलीतील मतदार कौल देणार आहेत.