प्रभात वृत्तसेवा खालापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची जुनी मैत्री सर्वपरिचित आहे. लोकसभा निवडणुकीत मतभेद झाले असले तरी, खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शेकाप आणि शिवसेना (ठाकरे गट) युतीने परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे.खोपोलीतील सभेत व्यासपीठावर शेकापचे पदाधिकारी दिसल्यावर तटकरे यांनी असेच सोबत रहा, असे आवाहन केले. यावरून जिल्हा परिषदेच्या आघाडीची चर्चाही रंगली. तटकरे सोबत माझे वैर नाही. ते माझ्याबद्दल चांगले बोलत असतील तर मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनील पाटील यांच्यासह शेकापचे उमेदवार निजामुद्दीन जळगावकर, विनिता कांबळी, संतोष मालकर, शिल्पा मालकर, रविंद्र रोकडे यांच्या प्रभागाला भेट देत प्रचाराचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्यांनी खोपोली बाजारपेठेत व्यापाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शिवानी जंगम, दिलीप पोरवाल, राजू अभाणी, अबूबकर जळगावकर, शांताराम पाटील, जयत पाठक यांच्यासह शेकापक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.