प्रभात वृत्तसेवा चाकण – माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाची साथ सोडत आज शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) धनुष्य हाती घेतले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशमुख यांच्या या भूमिकेने खेड तालुक्याच्या राजकारणाचे वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आमदार शरद सोनावणे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अतुल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख यांच्या प्रवेशाचे स्वागत करत, “अतुल देशमुख यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे,” असे म्हटले. ‘तालुक्यात भगवा फडकवायचा’ हेच आता एकमेव ध्येय ठेवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, त्यांनी आपल्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करत, ‘लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’ असे स्पष्ट केले. चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ५००० कोटी रुपयांची मंजुरी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशमुख यांचा प्रवेश म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्याला नवी ताकद मिळाली असून, शिवसेना नेहमी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. “आम्ही सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणार आहोत आणि आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवार उतरवून तालुक्यात भगवा फडकवू.” – अतुल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य