प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – पिंपरी बुद्रुक (ता. खेड) ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी, तसेच निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित मनमानीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीचे खेड तालुका अध्यक्ष तुषार गायकवाड यांनी गटविकास अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. सन 2025-26 मधील मंजूर विकासकामांसाठी ठेकेदारांकडून दरपत्रके मागवण्यासाठी ग्रामपंचायतीने वृत्तपत्रातून आवाहन केले होते. तथापि, टेंडर स्वीकारूनही त्याची योग्य प्रकारे उघडणी न करता काही सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने ठेकेदाराशी अन्याय केला असल्याचा आरोप गायकवाड यांनी निवेदनात केला आहे. ग्रामपंचायतमधील मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू केली नाही, तर जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन युवक आघाडीने दिला. ग्रामपंचायतचा मनमानी कारभार उघडकीस आणल्याचे गायकवाड यांनी सांगितले. निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर यांनी स्वीकारले; मात्र यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.