प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून सुरू असलेल्या प्रचार वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता गावोगावी मोठ्या आवाजात फिरणार्या पिकअप, टेम्पो व अन्य वाहनांमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांनी केली आहे.दहावी व बारावीच्या सराव परीक्षा सुरू असताना सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत बेकायदेशीररीत्या मोठ्या आवाजात प्रचार सुरू असल्याचे चौधरी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या ध्वनी प्रदूषणाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असून, विशेषतः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी यामुळे त्रस्त झाले आहेत. तसेच आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या आवाजाचा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे आणि उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून नियमबाह्य प्रचार वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.पै. बाळासाहेब चौधरी हे पुणे जिल्हा भारतीय जनसंसदचे अध्यक्ष तसेच खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असून, या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित असल्याने प्रचाराला वेग आला आहे. अपक्षांसह सर्वच पक्षीय इच्छुक उमेदवारांनी अनधिकृत प्रचार सुरू केल्याचे चित्र असून, प्रशासन याबाबत नेमकी काय कारवाई करणार, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.