Khed News – खेड तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खेड तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केला. राजगुरुनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, खेड तालुका बाजार समितीचे संचालक पप्पू टोपे, सरपंच दत्ता मांडेकर आदी उपस्थित होते. बुट्टे पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्याचा विषय हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यासाठी पंचायत समितीमार्फत टंचाई आराखडा तयार केला जातो. या आराखड्यात 13 प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश असतो. मात्र खेड तालुक्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता केवळ सह्या करून आराखडा पुढे जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून वस्तुनिष्ठ आढावा घेतला गेला नाही. परिणामी, अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आराखड्यातून वगळल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीटंचाई. तालुक्यात सुमारे 15 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव असून 109 गावठाणे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 70 ते 80 विंधनविहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना किरकोळ दुरुस्तीअभावी बंद पडल्या आहेत. मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा बंद असलेल्या विद्युत पंपांसाठी निधीची गरज असताना, नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी तालुक्याला एक रुपयाही मंजूर करण्यात आलेला नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. मात्र पंचायत समितीने केवळ औपचारिकता पूर्ण केल्यासारखी भूमिका घेतली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील हजारो नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. तालुक्यातील प्रश्नांपेक्षा रिलबाजीला प्राधान्य खेड तालुक्यात अनेक पुढारी असूनही पाणी प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका शरद बुट्टे पाटील यांनी केली. अनेक पुढारी सध्या लग्न, साखरपुडे आणि विविध समारंभात व्यस्त आहेत. काही जण तर सोशल मीडियासाठी रिल बनवण्यात अधिक रमले आहेत. मात्र जनतेने त्यांना निवडून दिले ते प्रश्न सोडवण्यासाठी, असा टोला त्यांनी लगावला.