प्रभात वृत्तसेवा चिंबळी – तळेगाव दाभाडे-उरूळी कांचन बाह्यवळण लोहमार्ग प्रकल्पाला मोई (ता. खेड) येथील बाधित शेतकर्यांनी तीव्र विरोध केला असून, मनमानी केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.तळेगाव दाभाडे ते उरूळी कांचन असा प्रस्तावित 80 कि.मी. बाह्य वळण लोहमार्ग मावळ-खेड-हवेली तालुक्यातून जाणार असून, काही दिवसांपूर्वी झालेल्या सघोष सर्वेक्षणाला मोई (ता. खेड) परिसरातील शेतकरीवर्गाने जोरदार विरोध दर्शविला. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीभूमी जाण्याची भीती असल्याने मोई ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशाराही दिला आहे. मोई येथील निघोजे-मोई रस्त्यावर शेतकर्यांनी मोठ्या संख्येने आंदोलन करत रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.शेतकर्यांचे म्हणणे आहे, जीव गेला तरी चालेल, पण आमच्या शेतातून लोहमार्ग होऊ देणार नाही.खेड तालुक्यातील दक्षिण भागातील एकूण बारा गावांमधून हा मार्ग जाणार आहे. ग्रामस्थांच्या आक्षेपांनुसार प्रस्तावात बदल करावा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी शेतकरी प्रतिनिधींची जिल्हा अधिकार्यांसोबत बैठक झाली. यावेळी प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे शेतकरी सांगतात. आंदोलनावेळी खेड तालुका रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मारुती येळवंडे, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. दिलीप मोहिते-पाटील यांचे भूमिका.. प्रकल्पाबाबत विचारणा केली असता माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील म्हणाले, येणार्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात व रेल्वे कार्यालयात रेल्वे प्रशासन आणि प्रकल्प बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. शेतकर्यांचा न्याय्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.