प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा सपाटा सुरू केला असून, त्यातून ध्वनीप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता गावोगावी फिरणार्या प्रचार वाहनांमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, रुग्णांचे उपचार तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू असताना सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत पिकअप, टेम्पो व अन्य प्रचार वाहनांवरून मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवले जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, वस्त्या तसेच रुग्णालय परिसरातही नियमबाह्य प्रचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते पै. बाळासाहेब चौधरी यांनी प्रशासनाविरोधात ठाम भूमिका घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निवेदनात परवानगीविना व नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेला प्रचार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा, निवडणूक आचारसंहिता तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार शाळा, रुग्णालय परिसरात व रात्रीच्या वेळेत मोठ्या आवाजातील प्रचारास बंदी आहे. मात्र खेड तालुक्यात हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवर्यात सापडली असून, नियम सर्वसामान्यांसाठीच का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पै. बाळासाहेब चौधरी हे पुणे जिल्हा भारतीय जनसंसदचे अध्यक्ष तसेच खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असून, त्यांनी या प्रश्नाला सामाजिक व सार्वजनिक स्वरूप देत तात्काळ कारवाई, प्रचार वाहने जप्त करणे आणि दंडात्मक कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित असताना अपक्षांसह सर्वच पक्षीय इच्छुक उमेदवारांनी बेकायदेशीर प्रचार सुरू केल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रशासन नियमांची कठोर अंमलबजावणी करणार की पुन्हा एकदा डोळेझाक करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणार्या या प्रचारावर प्रशासन वेळेत पावले उचलणार का, की निवडणुकीच्या गदारोळात हा गंभीर प्रश्न दुर्लक्षितच राहणार-हा सवाल आता अधिक तीव्रपणे उपस्थित होत आहे.