इस्लामाबाद : जर पाकिस्तानवरील हल्ले सुरू राहिले, तर या हल्ल्यांना पाकिस्तान 50 पट अधिक प्रत्युत्तर देईल, असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानला दिला आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानी प्रशासन भारताचे बाहुले म्हणून वागत असल्याचा आरोप देखील आसिफ यांनी केला. सीमाभागातील तणावाच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये इस्तंबुल येथे सुरू असलेली चर्चा नाट्यमयरितीने अपयशी ठरल्यानंतर ख्वाजा आसिफ यांचे हे धमकीचे वक्तव्य आले आहे. टिव्हीवरच्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान आसिफ यांनी ही धमकी दिली आहे. पाकिस्तानशी चर्चा करायला आलेल्या अफगाण शिष्टमंडळाचे आपल्याला कौतुक आहे. भारताचे बाहुले म्हणून पाकिस्तानशी संघर्ष करण्याचे आणि बडबड करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. भारताने आपल्या पश्चिमेकडील सीमेवर झालेल्या पराभवाची भरपाई काबूलच्या माध्यमातून सुरू केली आहे. अफगाणिस्तानने आता भारताशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. अफगाणी प्रतिनिधींनी भारताला आणि भारतातल्या मंदिरांना नुकतीच भेट दिली आहे, असे आसिफ म्हणाले. भारताला आता पाकिस्तानबरोबर कमी तीव्रतेचे युद्ध करायचे आहे. त्यासाठी भारत अफगाणिस्तानचा वापर करत आहे, असा आरोपही आसिफ यांनी केला. जर अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे नुसते बघितले, तरी आम्ही त्यांचे डोळे काढून ठेवू . आम्ही अफगाणिस्तानला ५० पट अधिक प्रत्युत्तर देऊ, अशी दर्पोक्तीही आसिफ यांनी व्यक्त केली.