Khatav News – लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा उशीरा का होईना विचार करुन पाटबंधारे विभागाने येरळा नदीपात्रात नेर धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्याबद्दल खटावकरांनी पाटबंधारे विभागाचे आभार मानले. जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते आणि खटाव – माण ॲग्रो प्रोसेसिंगचे संचालक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नदीपात्रानंतर डाव्या आणि उजव्या कॅनॉलमधूनही दहा दिवस पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी केली होती. उन्हाळी पिके जगवण्यासाठी आणि विहीरी, बोअरवेल्स तसेच गावोगावच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवण्यासाठी नेर धरणातून पाणी सोडावे म्हणून खटाव, पुसेगावसह लाभक्षेत्रातील शेतकरी, पदाधिकारी, विविध संघटनांनी आंदोलने केली होती. सर्वांच्या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने एक मे रोजी येरळा नदीपात्रात आणि मुख्य कॅनॉलमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. खटाव येथील पाटबंधारे शाखेत जावून प्रदीप विधाते आणि राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचने अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी विधाते आणि पाटील यांनी पाणी सोडण्याच्या नियोजनाची माहिती घेतली. सध्या नदीपात्रात सोडलेले पाणी मंगळवारी सकाळी भांडेवाडीच्या पुढे पोहचले आहे. दहा दिवसापर्यंत पाणी सोडण्याचे आदेश वरीष्ठ स्तरावरुन देण्यात आल्याचे समजत आहे. त्यानंतर नेरमधील पाणी डाव्या आणि उजव्या कॅनॉलमधून सोडावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. कॅनॉलमधून पाणी सोडले तरच परिसरातील विहीरी, बोअरवेल्स, बंधाऱ्यांची भूजलपातळी वाढणार असल्याचे पाटील आणि विधाते यांनी निदर्शनास आणून दिले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खटाव शाखेतील अधिकाऱ्यांनीही सदर मागणीबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले. नेर धरणात गेल्या वर्षी आलेले पावसाचे तसेच जिहेकठापूर योजनेचे पाणी, माण तालुक्यात सोडण्यात आलेले पाणी, खटाव तालुक्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोज आदी माहितीही पाटील आणि विधाते यांनी घेतली. यावेळी माजी जि.प. सदस्य अशोकाराव कुदळे, जेष्ठ नेते रसुलभाई मुल्ला, मुगुटराव पवार, किशोर डंगारे, मनोज देशमुख, किसनराव मोरे, श्रीरंग इंगळे, बाळू जगदाळे, राहुल जमदाडे आणि शेतकरी उपस्थित होते.