Kharif season : खरीप उत्पादनाला हवामानाचा फटका; धान, मका, सोयाबीनचे उत्पादन घटणार, महागाई वाढणार?
Kharif season : कमी पाऊस आणि अल निनोमुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज. डाळी, खाद्यतेल आणि साखरेच्या किमती वाढणार का?

Kharif season : अल निनोचा प्रभाव आणि पावसाच्या अनियमिततेमुळे यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, २०२६-२७ मध्ये भात, मका, कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, एकूण अन्नधान्य उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी खरीप उत्पादनाचे प्राथमिक अंदाज जाहीर केले. हे अंदाज पुढील काळात बदलू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या गोदामांमध्ये तांदूळ आणि गव्हाचा पुरेसा साठा असल्याने अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोयाबीन उत्पादनात मोठी घट –
सरकारी अंदाजानुसार, यंदा भाताचे उत्पादन १२.१९ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात २.२८ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. मक्याचे उत्पादन २.६०६ कोटी टन राहण्याचा अंदाज असून, त्यात १४.५ टक्क्यांची घट होऊ शकते. कडधान्यांचे उत्पादन ७१.३ लाख टन, तर तेलबियांचे उत्पादन २.३९४ कोटी टन राहण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे उत्पादन १.०२४ कोटी टन राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ते १.२५९ कोटी टन होते.
खाद्यपदार्थ महागणार का?
कमी पाऊस आणि उसाच्या उत्पादनातील घटीमुळे २०२६-२७ मध्ये साखरेचे उत्पादन २.६५२ कोटी टनांवर येण्याचा इस्माचा अंदाज आहे. दरम्यान, डाळी, खाद्यतेल आणि मक्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. मात्र, उत्पादन घटले म्हणजे लगेच महागाई वाढेल असे नाही. सरकारी साठा, बाजारातील आवक, आयात आणि मागणी यावरही किमती अवलंबून असतील.





