satara | उत्तर कोरेगावमध्ये खरीपातील घेवडा पिक पावसाच्या प्रतीक्षेत

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – जून संपून जुलै महिन्यामध्ये ही अद्याप मोसमी पावसाचा मागमूस नाही.उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये ऐन जोमात आलेले खरिपातील घेवडा, वाटाणा आणि सोयाबीन व इतर कडधान्य पिक पावसाने पाठ फिरवल्याने धोक्यात आली असून गेल्या दहा दिवसांपासून उन्हामुळे पिक कोमजू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बळीराजा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत व आस लावून बसला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली आहे. कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती उद्भभवल्याने हंगाम अडचणीत येऊ शकतो. उगवून आलेली पिके ऊन पडल्याने कोमेजून जात आहेत.
मे महिन्यात समाधानकारक वळीव पाऊस झाल्याने खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे उरकण्यास शेतकऱ्यांना मदत झाली. थोड्याफार झालेल्या पाणीसाठ्यामुळे टंचाई कमी झाली आहे. जुलै महिना सुरू झाला असला तरी आजही परिसरातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
वळीव पावसाने काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. या कमीअधिक झालेल्या पावसावर मशागतीची कामे करून शेती पेरणी योग्य करून ठेवली होती. जून महिन्याच्या सुरुवातीपासून रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे वरुण घेवडा, सोयाबीन,
चवळी, मूग, वाटाणा, मटकी, काळा घेवडा अशी कडधान्यांची पेरणी उरकली आहे. अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी बी बियाण्यानी काळ्या आईची ओटीभरण्याचे धाडस केले. पिकांची उगवण चांगली झाली असून आता त्याच्या वाढीसाठी पाऊस अपेक्षित आहे.
पेरणी योग्य वेळेत झाल्यामुळे पिकांची चांगली उगवण झाली आहे. मात्र आता वरुणराजाने डोळे वटारले आहेत. जवळपास १५ दिवस झाले पावसाने पाठ फिरवली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. मात्र पूर्वेकडे ठणठणाट झाला आहे. खरीप हंगामातील पिके ही नाजूक समजली जातात. कडक उन्हामध्ये ती तग धरू शकत नाहीत. सध्या चांगल्या पावसाची आवश्यकता आहे. पावसाने पाठ फिरवल्यास बळीराजाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
घेवड्याला एकरी बारा हजार रूपयांचा खर्च
गतवर्षी उन्हाळी हंगामाचे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी वरुण घेवडा बियाणे १०० ते १५० रुपये किलो दराने विकत घ्यावे लागले. त्यामुळे खर्चामध्ये मोठी वाढ झाली. साधारण एकरी २५ ते ३० किलो घेवडा बियाणे लागते.
त्याचा खर्च जवळपास चार हजार, रासायनिक खतांचे एक पोते १ हजार ३००, पेरणी खर्च १ हजार ५०० आणि मशागत नांगरट व फणपाळी ४ हजार ५०० रुपये खर्च झाला. एकरी १२ हजार ५०० रुपये आजमितीस शेतकऱ्यांनी मातीत घातले आहेत.
घेवडा पिकाची विक्रमी पेरणी
पिंपोडे बुद्रुक व वाठार स्टेशन मंडलात घेवडयाचे ५२०० हेक्टर,वाटाणा ५८० हेक्टर,सोयाबीन ४३७ सरासरी इतके विक्रमी खरिपातील पेरणी झाली आहे.मात्र खरिपातील पिक अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.





